नवी दिल्ली : १० टक्के इथेनॉल मिश्रीत पेट्रोल विक्रीचे उद्दिष्ट गाठल्यानंतर भारत पुढील काही दिवसांत २० टक्के इथेनॉल मिश्रीत पेट्रोलचा प्रायोगिक तत्त्वावर पुरवठा सुरू करेल, असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले. मंत्री पुरी यांनी इंडिया एनर्जी वीक २०२३ -‘डांस टू डिकार्बोनाइज’च्या रन-अप पहिल्या जनजागृती कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. ते म्हणाले की, भारताने जून महिन्यात १० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आणि नोव्हेंबर २०२२ च्या आपल्या मुळ उद्दिष्टापेक्षा ते खूप आधी आहे. ते म्हणाले की, ई २० (पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण) प्रायोगिक तत्वावर एक अथवा दोन दिवसांत निवडक बाजारात सुरू होईल.
आपल्या ऊर्जेची गरज भागविण्यासाठी, आयात इंधनावरील अवलंबीत्व कमी करण्यासाठी ऊसापासून इथेनॉल उत्पादन घेतले जाते आणि या कृषी उत्पादनाला पेट्रोलमध्ये मिसळले जाते. याशिवाय, इथेनॉल मध्ये जीवाश्म इंधनाच्या तुलनेत कमी कार्बन फुटप्रिंट असते. त्यातून देशाला आपल्या जलवायू उद्दीष्टांची पूर्तता करण्यास मदत मिळाली आहे. मंत्री पुरी यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात १५ शहरांची निवड करण्यात आली आहे. ते म्हणाले की, आम्ही आता आणि एप्रिल २०२५ यादरम्यान देशभरात ई २० टप्प्याटप्प्याने लागू करण्याचे निश्चित केले आहे.