पिपराईच, मुंडेरवा साखर कारखान्याने आणला शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा

गोरखपूर : योगी सरकारने जेव्हा उत्तर प्रदेशातील सत्ता सांभाळली तेव्हा, गोरखपूरमधील बंद पडलेल्या पिपराइच आणि मुंडेरवा साखर कारखान्याची धुराही घेतली. आज अत्याधुनिक टेक्नॉलॉजी असलेले हे कारखाने शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा वाढवत आहेत. अनेक दशकांपासून कारखाने बंद होते. त्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल होते. आपल्या उपजिविकेसाठी त्यांना गाव सोडून बाहेर कामाच्या शोधात जावे लागले होते. आता कारखाने सुरू झाल्याने शेतकरी पुन्हा ऊस पिक घेत आहेत. जागतिक स्तरावर मागणी असलेल्या सल्फरमुक्त साखर उत्पादन करण्यासह कारखाने स्वतः वीज उत्पादन करीत आहेत.

प्रभात खबरमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांना कारखान्यांनी गेल्या हंगामातील शंभर टक्के बिले दिली आहेत. याशिवाय चालू गळीत हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत ऊस पुरवठा केलेली बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू केली आहे. पिपराईचमध्ये स्थापन केलेल्या राज्य साखर तथा ऊस विकास महामंडळाच्या कारखान्याने गेल्या चार वर्षात, २०१८-१९ ते २०२१-२२ या कालावधीत ३२० कोटी ३५ लाख ४१ हजार रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांना अदा केली आहेत. तर मुंडेरवा साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ३८० कोटी ३६ लाख ३७ हजार रुपयांची बिले दिली आहेत.

ऊस उपायुक्त उषा पाल यांनी सांगितले की, चालू हंगाात दोन्ही कारखान्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंतची बिले बँकांच्या खात्यात जमा केली आहेत. पिपराइच कारखान्याने १५ डिसेंबरपर्यंत ८,४२२ शेतकऱ्यांच्या ५.५५ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. त्याचे मूल्य १९.१९ कोटी रुपये आहे. मुंडेरवा कारखान्याने ७,७९४ शेतकऱ्यांच्या ३.५७ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. शेतकऱ्यांना ८२.७८ लाख रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here