पुणे : तालुक्यातील सभासदांचा ऊसतोड वेळेत व्हावा, यासाठी संघर्ष सुरू आहे. जवळपास दीड वर्षाचा कालावधी उलटूनही सभासदांचा ऊस तुटून जात नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी टाहो फोडला आहे. वाढलेले आडसाली उसाचे क्षेत्र, घटत असलेले वजन, सभासदांचे होणारे आर्थिक नुकसान आणि कारखान्यांचे ऊस तोडीचे फसलेले नियोजन यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांकडे संचालक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
ऊस लवकर जावा म्हणून शेतकरी स्वतःच उसाला काडी लावत आहेत. संचालक आम्हाला शेतकऱ्यांच्या उसाचे काही घेणे-देणे नसल्यासारखे वागत आहेत. उसाचे गाळप करण्याची सामूहिक जबाबदारी असतानाही संचालक शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे टाळत आहेत. कारखाना निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने आता खोटी ठरू लागली आहेत. संचालकांनी गावपातळीवर तसेच कारखान्यामध्ये राजकारण न करता सभासदांचा ऊस वेळेत यावा, यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे असे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.