धर्मशाला : राज्य सरकार कांगडातील इंदौरा विभागात साखर कारखाना सुरू करण्याची शक्यता तपासत आहे, असे प्रतिपादन हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी केले. ते इंदौरा येथे १६१ कोटी रुपयांच्या १३ विकास योजनांच्या कोनशीला समारंभानंतर जनतेशी संवाद साधताना बोलत होते. त्यांनी इंदौरा येथे फायर सब स्टेशन, सुध भटोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, बदुखर प्राथमिक आरोग्य केंद्राचे सीएचसीमध्ये अपग्रेडेशन, सान्याल आणि सूरजपूरमध्ये आयुर्वेदिक डिस्पेन्सरी उघडणे, चार शाळांचे अपग्रेडेशन, आयटीआय गंगधमध्ये नवा ट्रेड सुरू करणे, पशू वैद्यकीय दवाखान्याचे अपग्रेडेशन या विषयांची घोषणाही केली.
ते म्हणाले, घेटा येथील पशू चिकित्सालयाला मुख्यमंत्री आरोग्य पशू औषधालयाच्या रुपात अपग्रेड करण्यात येईल. त्यांनी विभागात रस्ते, पूल तयार करणे आणि सुरदावा येथे क्रिडांगणासाठी ४५ लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली. मुख्यमंत्री ठाकूर म्हणाले की, काँग्रेसने गेल्या ५० वर्षात काहीच केले नाही. कारण त्यांचे नेते सत्तेचा आनंद घेण्यात मग्न होते. ते म्हणाले, काँगरेसकडून एकही योजना सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे हिमाचलच्या लोकांना काहीच मदत मिळाली नाही.
खासदार किशन कपूर यांनी सांगितले की, डबल इंजिन सरकारने राज्याला प्रगती आणि समृद्धीच्या युगात नेले आहे. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येईल असे ते म्हणाले.