कोल्हापूर : काळम्मावाडी धरण गळती प्रतिबंधक उपाययोजनेचे काम लांबणीवर पडल्यामुळे कागल तालुक्यातील साखर कारखान्याच्या ऊस लावण आणि खोडवा पिकामध्ये २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. धरणाची गळती काढण्यासाठी सरकारने ऑक्टोबर २०२३ मध्ये ८० कोटी रुपये मंजूर केले. गेल्या सहा महिन्यांपासून निविदा प्रक्रिया सुरू होऊन अद्याप ती पूर्ण झालेली नाही. निविदा मंजुरीस उशीर आणि मे महिन्यात सुरू होणारा वळीव, मान्सूनमुळे यंदाच्या पावसाळ्यापूर्वी काम सुरू होण्याची शक्यता धूसर आहे. परिणामी, साखर कारखान्यांच्या पुढील गळीत हंगामावर परिणाम होणार आहे.
कागल तालुक्यातील मंडलिक साखर कारखाना, छत्रपती शाहू साखर कारखाना, बिद्री साखर कारखाना, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना तसेच अन्नपूर्णा शुगर फॅक्टरी या साखर कारखान्यांच्या ऊस लावण आणि खोडव्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शेतकऱ्यांनी नोंदी दिलेल्या नाहीत, प्रत्येक कारखान्यामध्ये २५ ते ३० टक्के नोंदी झालेल्या नाहीत. त्यामुळे पुढील वर्षीच्या गळीत क्षमतेवर परिणाम होणार आहे. पाटबंधारे विभागाने नोव्हेंबर २०२३ मध्ये काळम्मावाडी धरणाच्या गळती प्रतिबंधक कामास सुरुवात होणार असल्याचे सांगत कमी पाण्याची गरज असलेल्या पिकांची निवड करावी असे आवाहन केले होते. या सूचनांचे पालन शेतकऱ्यांनी केले, मात्र अधिकाऱ्यांनी उपाययोजना केली नाही. परिणामी लाखो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.