सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना नेहमीच समाजहितपयोगी उपक्रम राबवित असतो. त्यातूनच आता पुन्हा वृक्षारोपण कार्यक्रम राबविला आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुंडल (ता.पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. लाड सहकारी साखर कारखान्यावर वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. कारखान्याचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, वीरेंद्र देशमुख, विलास जाधव, दिलीप पार्लेकर, किरण पाटील, उदय लाड, सागर पाटील यांच्यासह कर्मचारी उपास्थित होते.
अध्यक्ष शरद लाड म्हणाले की, कारखान्याने आमदार अरुण लाड यांच्या वाढदिवसानिमित्त आजवर हजारो वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धनही केले आहे. परंतु, यावर आम्ही थांबलो नाही ही वृक्ष लागवडीची परंपरा आम्ही नेहमी चालू ठेवू. वृक्ष लागवड आणि संवर्धन काळाची गरज आहे, माणसाची प्राणवायूची गरज भागवायची असेल तर वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन केले पाहिजे अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.