नवी दिल्ली : देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा १२ वा हप्ता मिळाला आहे. आता पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. ज्या शेतकऱ्यांना बारावा हप्ता मिळाला नाही, ते शेतकरी कृषी विभागात जावून माहिती घेत आहेत. आगामी वर्षाचे, २०२३-२४ चा अर्थसंकल्प लवकरच सादर होणार आहे. केंद्र सरकार त्याची तयारी करीत आहे. देशातील शेतकऱ्यांना फायदा मिळावा याची तयारी बजेटमध्ये केंद्र सरकार करीत आहे. या अंतर्गत पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या निधीबाबत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत या योजने अंतर्गत वार्षिक तीन हप्ते शेतकऱ्यांना दिले जातात. चार महिन्यांनी २,००० रुपये मिळतात. वार्षिक ६,००० रुपये दिले जातात. प्रसार माध्यमातील वृ्त्तानुसार, केंद्र सरकार बजेटमध्ये हप्त्यांमध्ये बदल करू शकते. योजनेचा निधी वाढवला जाईल अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकार हप्ते वाढवून ६ हजार ऐवजी ८ हजार रुपये करेल अशी चर्चा आहे. आतापर्यंत वर्षाला ३ हप्ते दिले जात होते. त्याऐवजी दर तीन महिन्यांनी एक असे चार हप्ते दिले जातील. दरम्यान, पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. काही शेतकरी अशा अडचणींमुळेच बाराव्या हप्त्यापासून वंचित राहिले. त्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.