पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या १३ व्या हप्ताची प्रतीक्षा आता संपणार आहे. केंद्र सरकारकडून या हप्त्याचे २००० रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. २४ फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेला चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे याच दिवशी नवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याशिवाय भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चातर्फे २४ पासून लोकसभा निवडणुकीसाठी आपले अभियान सुरू केले जाणार आहे. भाजप किसान मोर्चातर्फे देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन करणार आहे.
झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, २४ फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेला चार वर्षे पूर्ण होतील. यानिमीत्त, भाजप किसान मोर्चातर्फे देशभर शेतकऱ्यांचे मेळावे व इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजनांची माहिती दिली जाईल. याच दिवशी पंतप्रधान नवा हप्ता जारी करू शकतात, असे किसान मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. यावेळी पंतप्रधान शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांकडून फिडबॅक घेतला जाईल. यादरम्यान शेतकऱ्यांसाठी एका प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन किसान मोर्चातर्फे करण्यात येणार आहे. २०१९ पासून पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली होती. याअंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षी तीन समान हप्त्यांमध्ये ६००० रुपये दिले जातात.