पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश सरकारने एका खास अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानांर्गत सरकार जे या योजनेपासून वंचित आहेत, अशा सर्वांना त्याचा लाभ मिळवून देणार आहे. ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत योजनेचा लाभ मिळाला नाही, ते आता योजनेत सहभागी होवू शकतात.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे जुने हप्तेदेखील मिळवून दिले जाणार आहेत. बुधवारी राज्यात या अभियानाला सुरुवात करण्यात आली. राज्यात अभियानांतर्गत नोंदणी, बँक अकाउंट आधारशी जोडणे, ई-केवायसी, दस्ताऐवज पडताळणी व इतर कामे केली जातील. त्यानंतर शेतकऱ्यांना उर्वरीत सर्व रक्कम मिळेल. पात्र शेतकऱ्यांना जुने हप्तेसुद्धा मिळवून देऊ असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. सर्व ५५ हजार गावांमध्ये हे अभियान १० जूनपर्यंत सुरू राहिल. युपीत सरकारी निकषानुसार आतापर्यंत १० लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत.
२०१९ पासून पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली होती. याअंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षी तीन समान हप्त्यांमध्ये ६००० रुपये दिले जातात.