बाली येथे आयोजित जी-20 राष्ट्रांच्या नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर बायडेन यांची भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी यावेळी अत्यंत महत्त्वाच्या तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञानांचे प्रकार, अत्याधुनिक गणना, कृत्रिम बुद्धीमत्ता यांसारख्या, भविष्याभिमुख क्षेत्रांमध्ये सहकार्यासह भारत-अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. क्वाड, आय2यु2 इत्यादींसारख्या नव्या गटांच्या उभारणीदरम्यान भारत आणि अमेरिकेमध्ये दिसून आलेल्या घट्ट सहकारी संबंधांबाबत या नेत्यांनी समाधान व्यक्त केले.
दोन्ही नेत्यांनी यावेळी विशिष्ट मुद्यांच्या संदर्भात जागतिक तसेच प्रादेशिक पातळीवरील घडामोडींबाबत चर्चा केली.भारत-अमेरिका भागीदारी मजबूत करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून मिळत असलेल्या सातत्यपूर्ण पाठींब्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे आभार मानले. जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी भारताकडे असण्याच्या काळात दोन्ही देशांदरम्यान सखोल सहकार्य कायम राखले जाईल असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
(Source: PIB)