नवी दिल्ली : देशातील आगामी मान्सूनच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि सध्या देशभरात विविध ठिकाणी आलेल्या तीव्र उष्णतेचा लाटेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. सरकारी सुत्रांच्या हवाल्याने पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सरकारी अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, तीन दिवसांच्या युरोपीयन देशांच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान दिवसाला सात ते आठ बैठका घेणार आहेत. मायदेशी परतल्यावर लगेचच पंतप्रधान आपल्या कार्यालयात जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या देशातील अनेक शहरांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, बुधवारी दिल्लीसह देशाच्या काही भागात गारपीट आणि पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.