मुंबई – पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. ईडीने मुंबई व जवळपासच्या परिसरातील सहा विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. याशिवाय पीएमसी बँकेचे निलंबित संचालक जॉय थॉमस यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज अटक केली. याप्रकरणी 44 संशयित खात्यांपैकी 10 खात्यांचा गैरव्यवहार उघड झाला असून, उर्वरित 34 खात्यांची माहिती उघड करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्याची 4355 कोटींच्या गैरव्यवहाराची रक्कम वाढण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँकेने केलेल्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी बँकेचे निलंबित संचालक जॉय थॉमस, अध्यक्ष वरियर सिंग व इतर पदाधिकारी तसेच एचडीआयएल’चे संचालक राकेश वाधवा, सारंग वाधवा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ईडीनेही आता याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणात झालेल्या कथित मनी लाँडरिंगचा तपास करणार आहे.
पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात जॉय थॉमस हे प्रमुख संशयित आहेत. त्यांच्या चौकशीतून या प्रकरणातील महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता असल्यामुळे त्यांचा ताबा घेऊन चौकशी करणे आवश्यक आहे. त्यासाठी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस त्यांच्याबाबत माहिती घेत होते. अखेर शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती सहपोलिस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) राजवर्धन सिन्हा यांनी दिली.
या प्रकरणातील ही तिसरी अटक असून यापूर्वी एचडीआयएलचे राकेश व सारंग वाधवा यांना अटक करण्यात आली होती. त्या दोघांनाही 9 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.