सातारा : स्थानिकांची गळचेपी होत असल्याने पाटण तालुक्यातील प्रामाणिक व स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या हितासाठीच पाटण शुगरकेन या नवीन साखर कारखान्याची निर्मिती केली आहे. तालुक्यातील जनतेचा स्वाभिमान कदापि गहाण टाकू देणार नाही, असा विश्वास माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केले. पाटण शुगरकेन इंडस्ट्रीज साखर कारखान्याच्या पहिल्या रोलर पूजन व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे नेते तथा पाटण शुगरकेन इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यजितसिंह पाटणकर होते.
जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राजेश पवार, राष्ट्रवादी पाटण विधानसभा अध्यक्ष राजाभाऊ शेलार, टाटा मोटर्सचे कामगार नेते सुजीत पाटील, तालुका दूध संघ अध्यक्ष सुभाषराव पवार, पाटण अर्बन बँक चेअरमन बाळासाहेब राजेमहाडिक, खरेदी विक्री संघ चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, श्रीराम नागरी पतसंस्था चेअरमन विलासराव क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती . विक्रमसिंह पाटणकर म्हणाले की, स्थानिक शेतकऱ्यांच्या उसाला न्याय मिळावा, बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा या संकल्पनेतून सत्यजितसिंह पाटणकर यांनी साखर कारखान्याचे शिवधनुष्य अतिशय धाडसाने हाती घेतले आहे.
भविष्यात येथे इथेनॉल, बगॅसमधून वीजनिर्मिती आदी पूरक प्रकल्पही राबविण्याचा मनोदय आहे. शेजारील तालुक्यातल्या साखर कारखान्यांची गाळप क्षमता दहा ते बारा हजार मेट्रिक टनापर्यंत पोहोचली. मात्र, देसाई कारखाना अद्यापही १२५० मेट्रिक टनावरच समाधान मानत आहे. सत्यजितसिंह पाटणकर यांनी सांगितले की, स्वाभिमानी लोकांसाठी या कारखान्याची निर्मिती करत आहोत. देसाई कारखान्यापेक्षा उसाला जादा दर, वेळेत तोड, स्वाभिमानाची वागणूक, काटामारी न करता प्रामाणिक मोबदला दिला जाईल. यावेळी राजाभाऊ शेलार, सदाभाऊ जाधव, शंकरराव शेडगे, सुभाषराव पवार यांची भाषणे झाली. तालुका दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार यांनी स्वागत केले. सुहास माने यांनी आभार मानले.