नवी दिल्ली : देशातील निर्यातीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तेजी आली आहे. आणि या आर्थिक वर्षात यास आणखी गती मिळेल असा विश्वास वाणिज्य सचिव अनुप वधावन यांनी व्यक्त केला.
गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात निर्यातीमध्ये मोठी घसरण दिसून आली होती असे वधावन यांनी सांगितले. मात्र, आता हळूहळू परिस्थिती बदलत आहे. निर्यात सकारात्मक स्थितीत आली आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये देश मजबुत वाढीच्या दिशेने जाईल असे ते म्हणाले.
मात्र, निर्यातवाढीच्या आकडेवारीचा अंदाज लावणे शक्य नसल्याचे वधावन यांनी सांगितले. आकडेवारीनुसार डिसेंबर २०२० च्या तुलनेत देशात सकारात्मक वाढ दिसून आली आहे. यावर्षी मार्च महिन्यातील निर्यात ६०.२९ टक्के वाढून ३४.४५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मात्र २०२०-२१ मध्ये निर्यात ७.२६ टक्क्यांनी घटून २९०.६३ अब्जावर पोहोचली. अमेरिका, चीनसोबतच्या व्यापारातील ताणलेल्या संबंधाबाबत विचारले असता वाणिज्य सचिव म्हणाले, आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये अमेरिकेसोबत व्यापार वधारला. मात्र चीनसोबत व्यापारातील तुटीत सुधारणा झाली आहे.
आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये अमेरिकेला भारताकडून ५३ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. आणि २०२०-२१ मध्ये ५१ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. तर अमेरिकेकडून आयात २०१९ -२० मध्ये ३५.८ अब्ज डॉलर झाली. हीच आयात २०२०-२१ मध्ये २८ अब्जावर आली. चीनला भारताकडून होणारी निर्यात २०१९-२० मध्ये १६.६ अब्ज डॉलर झाली आहे. आणि २०२०-२१ मध्ये ती २१.२ अब्जावर पोहोचली. त्याचवेळी चीनकडून होणारी आयात २०१९-२० मध्ये ६५ अब्ज डॉलर होती. ती २०२०-२१ मध्येही अशाच पद्धतीने वाढली आहे