खाद्यपदार्थांच्या वस्तूंच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याने जून महिन्यात किरकोळ महागाईचा दर चार महिन्यांच्या घसरणीनंतर पुन्हा वधारला आहे. याची आकडेवारी समोर आल्यानंतर केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. अलिकडे तांदळाच्या किमतींमध्ये सतत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे केंद्र सरकार तांदूळ निर्यातीवर बंदी घालण्याचा विचारात आहे.
एबीपी लाईव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मोदी सरकार सर्व प्रकारच्या नॉन बासमती तांदळाच्या निर्यातवर बंदी घालण्याच्या विचारात आहे, असे ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. जर सरकारने नॉन बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली तर एकूण ८० टक्के तांदळाच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. सरकारच्या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील तांदळाच्या वाढत्या किमतीला आळा घालणे शक्य होईल. मात्र, जगभरात तांदळाच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकतो. देशांतर्गत बाजारपेठेत गेल्या दोन आठवड्यात २० टक्के वाढ दिसून आली आहे. सध्या निवडणुकीचे वर्ष जवळ आल्याने सरकार कोणताही धोका घेऊ इच्छित नाही.
भारत जगातील तांदळाचा मोठा निर्यातदार आहे. एकूण जागतिक निर्यातीत भारताचा हिस्सा ४० टक्के आहे. २०२२ मध्ये भारताने ५६ मिलियन टन तांदूळ निर्यात केला होता. भारत सर्वात स्वस्त दरात तांदूळ निर्यात करतो. मात्र, यंदा एमएसपी जाहीर झाल्यानंतर भारतातही दरवाढ झाली आहे. आणि इतर पुरवठादारांनीही दरवाढीस सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत.