महाराष्ट्रात पुढील हंगामात ऊस उत्पादनात वाढीची शक्यता

पुणे : यंदा चांगला पाऊस, पाण्यांनी भरलेली धरणे आणि पिकाला चांगला भाव यामुळे शेतकरी ऊस उत्पादनाकडे वळला आहे. महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाडा भागात ऊस पिकाचे उत्पादन विक्रमी पातळीवर वाढण्याची शक्यता आहे. नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक बी. बी. ठोंबरे यांनी ‘चीनीमंडी’शी बोलताना सांगितले की, गेल्यावर्षी पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांनी उसाऐवजी इतर पिके घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकरी ऊस पिकाकडे वळला आहे.

ठोंबरे म्हणाले की, पुढील वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात फारशी चढ-उतार होण्याची शक्यता कमी असली तरी मराठवाडा विभागातील उसाचे क्षेत्र आणि उत्पादन वाढीची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी जास्त ऊस लागवड करण्यामागे पाण्याबरोबरच पिकाला चांगला भाव हाही मुख्य घटक आहे. सोयाबीन, कापूस या पर्यायी पिकांतून कमी उत्पन्न मिळाल्याने शेतकऱ्यांनी उसाची लागवड सुरू केली आहे. पुरेसा पाणीपुरवठा आणि इतर पिकांचे घसरलेले भाव यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवडीचा विस्तार केला आहे.

दरम्यान, उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे पुढील पिक वर्षात महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन जास्त होण्याची शक्यता आहे. उत्पादनातील वाढीमुळे सरकारला २०२५-२६ मध्ये निर्यात पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळू शकते. रॉयटर्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र आणि शेजारील कर्नाटकातील जलाशयांमध्ये २०२३ च्या तुलनेत आतापर्यंत जास्त पाणीसाठा असल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसून येते. भारतातील वार्षिक मान्सूनचा पाऊस हा पाणी-केंद्रित पीक असलेल्या ऊसासाठी लागवड क्षेत्र निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. यंदा महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऊस उत्पादक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here