ढाका : बांगलादेश सरकार भारतातून आयात केलेला कांदा आणि साखर रमजानपूर्वी बाजारपेठेत पुरवू शकेल, असे वाणिज्य राज्यमंत्री अहसानुल इस्लाम टिटू यांनी रविवारी सांगितले. सचिवालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ५०,००० टन कांदा आणि एक लाख टन साखर आयात करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच भारताला पाठवण्यात आला होता आणि आम्हाला त्यांच्याकडून २०,००० टन कांदा आणि ५०,००० टन साखर आयात करण्याचे आश्वासन मिळाले आहे.
वाणिज्य राज्यमंत्री अहसानुल इस्लाम टिटू म्हणाले कि, आम्ही आमच्या मागणीनुसार त्यांच्याकडून उत्पादनांची आयात करण्यास यशस्वी होऊ, अशी आशा आम्हाला वाटते. ते म्हणाले की, भारताकडून कांदा आणि साखरेच्या पुरवठ्याबाबत परराष्ट्र मंत्र्यांकडून आश्वासन मिळाले असून गुरुवारच्या आत आम्हाला याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळेल. याशिवाय, सरकार इतर शेजारील देशांमधून दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आयात करण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.