कोल्हापूर : कर्नाटक सरकारने एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दुष्काळ आणि उसाची कमतरता यामुळे त्यांनी अचानक निर्णय बदलला आहे. त्यांनी आता दसऱ्यापासूनच कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने सीमाभागातील उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका सीमाभागातील साखर कारखान्यांना बसेल.
दरम्यान, राज्यात यंदा १४.०७ लाख हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपासाठी आहे. त्यामुळे राज्यात ८८.५८ लाख मेट्रीक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. यावर्षी ऊसाचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे उत्पादन दहा ते बारा टक्क्यांनी घटणार आहे. तशीच स्थिती कर्नाटकात आहे. उत्तर कर्नाटकातील दुष्काळ, ऊसाची कमी उपलब्धता यामुळे तेथेही मोठी कमतरता भासणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ऊसावर डोळा ठेवत त्यांनी कारखाने आठ दिवस आधीच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.