सोलापूर : यंदा जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस तोडणी मजूर, यंत्रांच्या तुटवड्याचा चांगलाच सामना करावा लागत आहे. तरीही या साखर हंगामात जिल्ह्याने गाळप व साखर उत्पादनात राज्यात आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात ३१ डिसेंबरअखेर साखर कारखान्यांनी ७४ लाख ४१ हजार ११८ टन उसाचे गाळप केले आहे. तर माढ्यातील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने सात लाख ६० हजार ७७६ टन ऊस गाळप करत राज्यात दुसरे स्थान पटकाविले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ३४ पैकी मोजक्या कारखान्यांकडे सक्षम तोडणी यंत्रणा आहे. कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता १,५६,६०० टन आहे, मात्र रोज ९२ हजार टन उसाचेच गाळप होत आहे. अकलूजच्या सहकार महर्षी कारखान्याने आणि पंढरपूरच्या विठ्ठल कारखान्याने साडेचार लाख टन तर दक्षिण सोलापुरातील जयहिंद शुगरने चार लाख टनाचे गाळप केले आहे. बबनराव शिंदे आणि गोकुळ शुगरने प्रत्येकी तीन लाख टन आणि लोकनेते, सासवड माळी, लोकमंगल (भंडारकवठे), सिद्धेश्वर, विठ्ठलराव शिंदे (करकंब), आवताडे शुगर, युटोपियन, गोकुळ-माउली या कारखान्यांनी प्रत्येकी दोन लाख टनाचे गाळप केले आहे.
विठ्ठल कार्पोरेशन, सिध्दनाथ, श्री शंकर, सीताराम महाराज, भैरवनाथ (लवंगी) हे कारखाने दोन लाखांजवळ आहेत. तर सांगोला, जकराया, भैरवनाथ (विहाळ), भीमा, विठ्ठल रिफाइंड या कारखान्यांनी प्रत्येकी एक लाख टन उसाचे गाळप केले आहे. उर्वरीत सात कारखान्यांचे गाळप एक लाखाच्या आत आहे.