अहिल्यानगर : प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिलाचे पैसे अदा करावेत, या मागणसाठी अहमदनगर (अहिल्यानगर) प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयात ठिय्या आंदोलन व मुक्काम आंदोलन करण्यात आले. प्रहारचे जिल्हाप्रमुख अभिजित पोटे, बाळासाहेब खर्जुले, ज्ञानेश्वर सांगळे, अप्पासाहेब ढूस, जालिंदर आरगडे, सोमनाथ गर्जे आदींसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत प्रादेशिक साखर कार्यालयाने तत्काळ कारखान्याच्या कार्यकारी संचालकांची बैठक घेऊन ३१ मेपर्यंत थकीत १४९ कोटींची ऊस बिले देण्याचे आदेश दिले आहेत.
आंदोलनावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी प्रादेशिक उपसंचालकांना धारेवर धरले. प्रादेशिक सहसंचालक कार्यालयातील संचालक, उपसंचालक आणि साखर आयुक्त कारखानदारांना पाठीशी घालत आहेत. त्यांचे साखर कारखान्यावर अजिबात नियंत्रण राहिले नाही असा आरोप अभिजीत पोटे यांनी केला. दरम्यान, प्रादेशिक उपसंचालक (साखर) शुभांगी गोंड यांनी सर्व कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना थकीत बिलांबाबत लेखी आदेश बजावले आहेत. साखर कारखानदारांनी ऊस बिले दिली नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत २२ मे रोजी आढावा घेण्यात आला आहे. तातडीने बिले अदा करावीत असे आदेश दिले आहेत. जर यात दिरंगाई झाल्यास कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.