सातारा : अजिंक्यतारा प्रतापगड सहकारी साखर उद्योगाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रतापगड सहकारी कारखान्यामध्ये सन २०२४-२५ या चालू गळीत हंगामात दि. १५ ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे प्रति मेट्रिक टन तीन हजार रुपयांप्रमाणे होणारी बिलाची रक्कम संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आल्याची माहिती अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे यांनी दिली.
जावळी येथील बंद असलेला प्रतापगड कारखाना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा कारखान्याच्या मदतीने सुरू करण्यात आला आहे. प्रतापगड कारखान्याचा दुसरा गळीत हंगाम जोमाने सुरू आहे. मागील २०२३-२४ चा हंगाम ऊस पुरवठादार शेतकरी आणि कामगारांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला होता. यंदाचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. या हंगामात आतापर्यंत ६१ दिवसांमध्ये एक लाख ३२ हजार ३९० मेट्रिक टन उसाचे गाळप करून, सरासरी ११.४४ टक्के साखर उतार्याने एक लाख ४८ हजार ५५० किंटल साखर उत्पादित झाली आहेत. या हंगामात दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकर्यांनी आपला संपूर्ण ऊस प्रतापगड कारखान्यात पाठवावा, असे आवाहन कारखान्याचे व्हाइस चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी केले आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.