सातारा : प्रतापगड साखर कारखाना अनेक अडचणींवर मात करून कारखाना पुन्हा उभा राहिला. कारखान्याने पहिल्याच गळीत हंगामात ३ लाख १ हजार ५१ मे. टन गाळप केले. कारखान्याचा गळीत हंगाम सांगता अंतिम ११ पोत्यांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी अधिकारी व कामगारांचा सत्कार करण्यात आला. आगामी काही वर्षातच कारखाना हा सातारा जिल्ह्यातील सर्वोच्च दर देण्याचा नावलौकिक मिळवेल, असा विश्वास अजिंक्यतारा – प्रतापगड साखर उद्योग समूहाचे मार्गदर्शक आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.
कारखान्याला केलेल्या सहकार्याबद्दल आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी ऊस पुरवठादार शेतकरी आणि कामगारांचे आभार मानले. सर्वांच्या सहकार्यामुळेच जावळीतील शेतकऱ्यांचे हक्काचे सहकार मंदिर पुन्हा उभे राहिले आहे. दराच्या स्पर्धेत टिकण्यासाठी कारखान्याने ३ हजार रुपये प्रतिटन दर दिला. आगामी हंगामात भरारी घेऊ असे शिवेंद्रराजे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, व्हा. चेअरमन शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्यताराचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे, रविंद्र परामणे, जयदीप शिंदे, अरुण कापसे, दादा पाटील आदी उपस्थित होते.