सातारा : आर्थिक अडचणींमुळे प्रतापगड सहकारी साखर कारखाना गेली चार वर्षे बंद राहिला होता; परंतु आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हा प्रकल्प पुन्हा उभारी घेत आहे. अजिंक्यतारा-प्रतापगड उद्योग समूहाच्या माध्यमातून गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात सव्वातीन लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले. आगामी गळीत हंगामात किमान चार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. सर्वांच्या सहकार्याने त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी केले. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर झाली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी विक्रमी ऊस उत्पादन करणाऱ्या तसेच कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवठा करणारे शेतकरी, तसेच कारखान्यातील विविध विभागात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. आगामी गळीत हंगामही यशस्वी करण्यासाठी शेतकरी व सभासदांनी ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. सभेला मार्गदर्शक सुनेत्रा शिंदे, उपाध्यक्ष अॅड. शिवाजीराव मर्ढेकर, संचालक अंकुशराव शिवणकर, राजेंद्र फरांदे, बाळासाहेब निकम, राजेंद्र शिंदे, प्रदीप शिंदे, प्रदीप तरडे, आनंदराव जुनघरे, आनंदा मोहिते पाटील, विठ्ठल मोरे, शोभाताई बारटक्के, ताराबाई पोफळे, बाळकृष्ण निकम, नानासाहेब सावंत, रामदास पार्टे, गणपत पार्टे, शांताराम पवार, विजय शेवते उपस्थित होते.