सातारा : ‘प्रतापगड’ येणाऱ्या हंगामात चार लाख टनाच्या गाळपाचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण करेल, असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. सोनगाव (ता. जावळी) येथील प्रतापगड कारखान्यातर्फे २०२३-२०२४ च्या गळीत हंगामासाठी रोलर पूजन कार्यक्रम झाला. त्यावेळी आ. भोसले बोलत होते. सभासद शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळावा, त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे (कै.) लालसिंगराव शिंदे यांचे स्वप्न अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योगसमूहाच्या व्यवस्थापनाकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही आ. भोसले यांनी सांगितले.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, कारखाना व्यवस्थापनाने तालुक्यातील सर्वाच्या उसाची नोंद घेतली आहे. यामध्ये पक्ष, गट-तट असा कोणताही निकष न लावता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप केले जाईल. कारखान्यात आम्ही कसलेही राजकारण करणार नाही. आमदार शशिकांत शिंदे असो किंवा दीपक पवार, तालुक्यातील कोणत्याही गटाच्या कार्यकर्त्यांचा ऊस नक्की गाळला जाईल, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
सौरभ शिंदे म्हणाले, अजिंक्यतारा- प्रतापगड साखर कारखान्याकडे आतापर्यंत ५१३४ हेक्टर क्षेत्र नोंद झाली आहे. शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त उसाच्या नोंदी कराव्यात, असे आवाहन शिंदे यांनी केले. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्यतारा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे यांच्यासह दोन्ही कारखान्याचे संचालक, अधिकारी व कर्मचारी, सभासद उपस्थित होते.