सातारा : प्रतापगड साखर कारखाना अनेक अडचणींवर मात करून ९२ दिवसांमध्ये कारखान्याने १,९१,००० मेट्रिक टन उसाचे गाळप करून, सव्वादोन लाख साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. आगामी काळात प्रतापगड कारखाना जिल्ह्यातील अग्रणी कारखाना म्हणून ओळखला जाईल, असे प्रतिपादन अजिंक्यतारा – प्रतापगड साखर उद्योग समूहाचे मार्गदर्शक आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. जावळी तालुक्यातील सोनगाव येथील प्रतापगड कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता आणि सव्वादोन लाख साखर पोत्यांच्या पूजन प्रसंगी ते बोलत होते.
प्रतापगड कारखान्याच्या संस्थापक संचालिका सुनेत्रा शिंदे, अध्यक्ष सौरभ शिंदे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्यतारा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे, नामदेव सावंत, रवींद्र परामणे, हणमंतराव जाधव, तानाजी शिर्के आदी संचालक उपस्थित होते. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, ऊस पुरवठादार शेतकरी सभासद आणि कामगारांच्या सहकार्याने अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योग समूहाने सुरू केला आहे. कारखान्याचा दुसरा गळीत हंगाम यशस्वी झाला आहे. यावर्षी जिल्ह्यात उसाचे क्षेत्र कमी असतानाही, प्रतापगड कारखान्याने सरासरी १८.५८ टक्के रिकव्हरीने हंगाम यशस्वी केला. पुढील वर्षी ५ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. कारखान्याने दोन्ही हंगामात १९ कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे. भविष्यात सर्व कर्ज भरून, व्याज कमी करण्याचा प्रयत्न राहील.