सांगली : वाळवा तालुक्यातील तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारण्यासाठी आम्ही राजारामबापू साखर कारखान्याच्यावतीने राजारामबापू क्षारपड जमीन निचरा प्रणाली योजना आणली आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील १० हजार एकर क्षेत्र क्षारपड झाले आहे. क्षारपड क्षेत्र वाढणे चिंताजनक आहे. यासाठी आम्ही आणलेल्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी केले.
बोरगाव (ता. वाळवा) येथे राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘समृद्ध भूमी अभियान’ प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विजय पाटील, प्रदीपकुमार पाटील, विठ्ठल पाटील, अभिजित पाटील, कार्तिक पाटील, माणिक पाटील, धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते.सुजय पाटील, जे. बी. पाटील यांनी राजारामबापू क्षारपड जमीन निचरा प्रणाली योजनेबाबत माहिती दिली.
प्रतीक पाटील म्हणाले की, प्रगत देशात सच्छिद्र पाईप निचरा प्रणालीचा यशस्वी वापर केला जात आहे. योजनेत एकरी रुपये ८० हजार रुपये खर्च येतो. शेतकऱ्यांनी रोख १० हजार रुपये भरायचे आहेत. त्यांना बँकांकडून कारखान्याच्या हमीवर कमी व्याजदरात ७० हजार कर्ज देणार आहोत. कार्तिक पाटील यांनी स्वागत केले. लालासाहेब वाटेगावकर यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश वाटेगावकर यांनी आभार मानले. विनायक जगताप यांनी सूत्रसंचालन केले. संचालक अतुल पाटील, उपसरपंच सचिन पाटील, सर्जेराव यादव, विकास पाटील, विनायक यादव आदी उपस्थित होते.