नांदेड : नांदेड विभागात गेल्यावर्षीच्या तुलनेत उसाचे लागवड क्षेत्र घटले आहे. मराठवाड्यात नांदेड जिल्हा सोडला तर इतर जिल्ह्यांत पावसाने ओढ दिल्यामुळे सर्वच पिकांना फटका बसला होता. विशेषतः पाणी कमी झाल्याने उसाचे वजन घटले होते. त्यामुळे सरासरी १० ते १५ टक्के उत्पादन घटणार, अशी शक्यता प्रादेशकि साखर सहसंचालकांकडून वर्तविण्यात आली होती. मात्र सध्याच्या पुरेशा पावसाने उसाच्या वजनात वाढ होण्यास मदत होणार आहे. क्षेत्र घटले तरी उत्पादनावर फारसा परिणाम होणार नसल्याचे प्रादेशिक साखर सहसंचालक विभागाकडून सांगण्यात येत आहे. नांदेड विभागातून ९०.२८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
नांदेड विभागात नदिडसह हिंगोली, परभणी व लातूर या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. या चार जिल्ह्यांतील २९ कारखाने आहेत. चार जिल्ह्यांत गेल्या वर्षी, २०२३-०२४ मध्ये ऊस लागवडीचे क्षेत्र १,६६,८५५ हेक्टर होते. यंदा १,२५,४८५ हेक्टर आहे. एकूण ४१ हजार ३७० हेक्टरने घट झाली आहे. परंतु, मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने मोठा दिलासा दिला आहे. यंदाही हीच परिस्थिती राहील. प्रादेशिक सहसंचालक एस. व्ही. रावल यांनी सांगितले की, यावर्षी साखर उत्पादनावर थोडासा परिणाम होईल, विशेषतः विभागातील लातूर, परभणीत घट होईल, नांदेड, हिंगोलीला उत्पादन चांगले राहील. सध्या मराठवाड्यातील सर्वच धरणाचा पाणीसाठा चांगला झाला आहे. जमिनीतील पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे २०२५-२६ मधील हंगाम चांगला राहणार आहे.