Agrimandi.live द्वारे 2023-24 हंगामासाठी साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज जारी

 नवी दिल्ली : एल निनोमुळे देशाच्या पुढील हंगामातील साखर उत्पादनावर होणाऱ्या परिणामांची  चिंता कायम आहे. तथापि, कृषी आणि कमोडिटीज़चे विश्लेषण आणि अंदाज व्यक्त करणारी देशातील अग्रगण्य कंपनी Agrimandi.live च्या मते, एल निनोचा 2023-24 हंगामातील साखर उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही. जोपर्यंत गंभीर दुष्काळाची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाही, तोपर्यंत देशातील साखर उत्पादन सामान्य होण्याची शक्यता Agrimandi.live ने वर्तविली आहे.

Agrimandi.live च्या मते, ऐतिहासिक डेटा बघितला तर असे लक्षात येते कि, एल निनोचा भारतीय साखर उत्पादनावर साधारणपणे एक वर्षानंतर परिणाम होतो. मागील हंगामातील चांगल्या पावसामुळे यंदा पाण्याची आणि जलाशयाची पातळी चांगली होती. शिवाय सकारात्मक हिंदी महासागर द्विध्रुव (IOD) एल निनोचा प्रभाव काही प्रमाणात कमी करेल, अशीही अपेक्षा आहे.

Agrimandi.live च्या अभ्यासानुसार, अनेक जागतिक हवामान मॉडेल्स सकारात्मक IOD चा अंदाज वर्तवत आहेत, जे सूचित करतात की भारतातील मान्सूनची स्थिती सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त असेल. ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ मेटिऑरॉलॉजी आणि युनायटेड नेशन्स क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने जुलैपासून सकारात्मक IOD अंदाज वर्तवला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तापमान 1 °C पेक्षा जास्त असेल. मागील एल निनो वर्षांमध्ये जसे की 1983, 1994 आणि 1997, सकारात्मक IOD मुळे मान्सूनच्या पावसात वाढ झाली. त्या वर्षांमध्ये एल निनोची परिस्थिती असूनही, भारतीय पर्जन्यमान अनुक्रमे 109%, 110% आणि 99.6% नोंदवले गेले.

या सर्व बाबी विचारात घेवून आणि हवामान उत्पन्नाच्या मॉडेलच्या आधारे, Agrimandi.live चा असा अंदाज आहे की, 2023-24 हंगामासाठी भारतीय साखरेचे उत्पादन इथेनॉल डायव्हर्जनसह 387.8 लाख मेट्रिक टन (LMT) पर्यंत पोहोचेल. इथेनॉल उत्पादनासाठी साखरेचा वापर 50 ते 55 LMT दरम्यान अपेक्षित आहे, परिणामी निव्वळ साखर उत्पादन अंदाजे 333 ते 338 LMT होण्याची शक्यता आहे. 2022-23 च्या हंगामात साखरेचे उत्पादन 329.1 LMT तर सुमारे 45 LMT साखर इथेनॉल उत्पादनासाठी वापरणे अपेक्षित आहे.

भारतातील प्रमुख साखर उत्पादक राज्यांपैकी एक असणारे महाराष्ट्र राज्य साखर उत्पादनातील अस्थिरतेबाबत ओळखले जाते. महाराष्ट्राच्या एकूण साखर उत्पादनापैकी  20-25% उत्पादन दुष्काळी समजल्या जाणाऱ्या मराठवाडा विभागातून येते. 2014-15 च्या अल निनो वर्षातही, जेव्हा पश्चिम महाराष्ट्रात सरासरी (LPA) 93% पाऊस होता आणि मराठवाड्यात फक्त 58% होता. तेव्हादेखील राज्यातील साखर उत्पादनात सरासरीच्या 36% वाढ झाली होती. राज्यात इथेनॉल उत्पादनासाठी वापरासह 131.0 LMT साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. इथेनॉल उत्पादनासाठी 17.4 LMT  साखर वळवून, महाराष्ट्रात साखरेचे निव्वळ उत्पादन 113.6 LMT अपेक्षित आहे. 2023-24 हंगामात महाराष्ट्रात उसाचे क्षेत्र 14.2 लाख हेक्‍टर असण्याची अपेक्षा आहे, जे चालू हंगामातील 14.5 लाख हेक्‍टरपेक्षा थोडे कमी आहे.

उत्तर प्रदेशात गेल्या सात वर्षांत साखरेचे उत्पादन 65-75 LMT वरून 115-125 LMT झाले आहे. बारमाहीवाहणाऱ्या नद्या आणि सिंचन व्यवस्थेत झालेल्या प्रगतीमुळे राज्यातील साखर उत्पादनावर एल निनोचा कमी परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाची 2014 मध्ये 48% आणि 2015 मध्ये 45% तूट असतानाही आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही राज्यात साखरेचे उत्पादन सामान्य मान्सून वर्षांपेक्षा जास्त होते. गेल्या चार हंगामात, साखरेचे उत्पादन 105 ते 110 LMT पर्यंत झाले.. 2022-23 हंगामात, उत्तर प्रदेशातील कारखान्यांनी सुमारे 20 LMT साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवली. राज्यात साखरेचे उत्पादन 105.4 LMT  झाले.

Agrimandi.live च्या अंदाजानुसार, 2023-24 हंगामात उत्तर प्रदेशात साखरेचे उत्पादन 102-105 LMT च्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. तसेच इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे 22-25 LMT साखरेचा वापर अपेक्षित आहे. 2023-24 हंगामात उत्तर प्रदेशात उसाचे क्षेत्र 24.2 लाख हेक्टर असण्याची अपेक्षा आहे, जे चालू हंगामातील 23.9 लाख हेक्टरपेक्षा थोडे जास्त आहे.

कर्नाटकातील साखरेचे उत्पादन इथेनॉल उत्पादनासाठी अंदाजे 10.1 LMT साखरेच्या वापरासह 67.5 LMT अपेक्षित आहे. कर्नाटकात साखरेचे निव्वळ साखर उत्पादन 57.4 LMT असण्याचा अंदाज आहे. 2023-24 हंगामात कर्नाटकात उसाचे क्षेत्र 6.9 लाख हेक्टर असण्याची अपेक्षा आहे, जे चालू हंगामातील 6.6 लाख हेक्टरपेक्षा किंचित जास्त आहे.

देशातील साखर उद्योग राष्ट्र उभारणीसाठी कटिबद्ध आहे आणि सरकारने ठरवून दिलेले इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 2023-24 हंगामात इथेनॉल उत्पादनासाठी साखरेचा वापर 2022-23 हंगामातील अनुमानित 45 LMT पेक्षा जास्त म्हणजेच सुमारे 52.8 LMT  होण्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मते, देशात मान्सून सक्रिय झाला असून तो आता प्रगत अवस्थेत आहे आणि येत्या काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Agrimandi.live एल निनोचा  येत्या हंगामात साखर उत्पादनावर होणार्‍या वास्तविक परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी हवामान आणि मान्सूनच्या प्रगतीचे बारकाईने निरीक्षण करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here