मन्सूरपूर : जिल्ह्यातील साखर कारखाने नव्या हंगामात इथेनॉल उत्पादन करू शकतात. अन्न विभागाचे संयुक्त संचालक जितेंद्र जुयाल यांच्या नेतृ्त्वाखाली साखर कारखान्यांचे व्यवस्थापक, इंधन कंपन्या, ऑटो मोबाईल कंपन्यांचे अधिकारी अशा सर्वांनी ब्राझीलमध्ये उत्पादनाची प्रक्रिया पाहिली. या शिष्टमंडळात मन्सूरपूर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अरविंद कुमार दीक्षित सहभागी होते. अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, २०२२-२३ मध्ये साखर कारखाने इथेनॉलचे उत्पादन वाढवतील. केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाने ब्राझील शुगर मॉडेलचा अभ्यास करून अहवाल सादर केला आहे. २०२५ पर्यंत केंद्र सरकारने २० टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दीक्षित यांनी सांगितले की, इथेनॉल उत्पादन वाढविल्यानंतर इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. साखर कारखान्यांत उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन वाढवून २० टक्के पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याच्या अभ्यासासाठी हे शिष्टमंडळ गेले होते. २० तज्ज्ञांचे पथक ब्राझीलच्या अभ्यास दौऱ्यात सहभागी होते. त्यांनी साखर कारखाने, शुगर मिल तसेच इतर कंपन्यांचा अभ्यास करून अहवाल केंद्र सरकारला पाठवला आहे.
इथेनॉल विशेषज्ज्ञ अरविंद कुमार दीक्षित यांनी सांगितले की, या पथकाने साओ पाउलो शहरातील कारखान्यांचा अभ्यास केला. साखर कारखाने इथेनॉल उत्पादन लक्षात ठेवून क्षमता वाढवत आहेत. तांत्रिक परिवर्तन करीत आहेत. त्यातून आर्थिक सुधारणा होईल आणि शेतकऱ्यांना उसाचे पैसेही वेळेवर मिळतील. जिल्हा ऊस अधिकारी आर. डी. द्विवेदी यांनी सांगितले की, सध्या जिल्ह्यातील कारखान्यांकडे उसाच्या रसापासून थेट इथेनॉल उत्पादनाचे तंत्र विकसित नाही. काही कारखाने या बदलासाठी प्रयत्नशील आहेत.