आजमगड : गाळप हंगामाची गती मंदावल्याने दी किसान सहकारी साखर कारखाना आता बंद करण्याचा विचार सुरू आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस संपण्याच्या मार्गावर आहे. मंगळवारी कारखान्याकडे फक्त १५ ट्रॉली ऊस गाळपास आला. गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ऊसाच्या गाळपाचे उद्दीष्ट पू्र्ण करत २४ लाख ३० हजार ३०० क्विंटल उसाचे गाळप केले आहे. एकूण १ लाख ६३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. याशिवाय एक लाख ६९ हजार क्विंट बी हेवी मोलॅसीसचे उत्पादन करण्यात आले आहे.
याबाबत जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, चालू हंगामात साखर कारखाना अनेकवेळा बंद पडला होता. काही वेळा तांत्रिक कारणांनी तर काही वेळा देखभाल-दुरुस्तीसाठी आणि उसाअभावी कारखाना बंद ठेवावा लागला. असे असुनही कारखान्याने ९० दिवसांचे गाळप केले आहे. गेल्या गळीत हंगामाकडे दृष्टिक्षेप टाकला तर कारखाना ८७ दिवस सुरू राहीला होता. तर २३.७५ लाख क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले होते. त्यापासून साखरेचे उत्पादन दोन लाख पाच हजार क्विंटल आणि सी हेवी मोलॅसीस १.१८ लाख क्विंटल उत्पादन करण्यात आले होते. गेल्या हंगामाच्या तुलनेत चांगली कामगिरी केल्याने कारखाना प्रशासन उत्साहीत आहे. शेतकऱ्यांना १५ जानेवारीपर्यंत ऊस बिले देण्यात आली आहेत. उर्वरीत बिले लवकरच दिली जाणार आहेत, असे सरव्यवस्थापक प्रसाद सोनकर यांनी सांगितले.