कोल्हापूर : साखर आणि संबंधित उद्योगासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत ‘चिनीमंडी’कडून येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी पाटील यांना ‘एसईआयए’ पुरस्कार जाहीर झाला आहे. कारखाना व्यवस्थापन, संचालक मंडळ आणि सभासदांसाठी हा गौरवाचा क्षण आहे. येत्या, १ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे अध्यक्ष पाटील यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे, असे कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी सांगितले.
‘चिनीमंडी’ ने २०२४ च्या शुगर अँड इथेनॉल इंटरनॅशनल अवॉर्ड्स (एस.ई.आय.ए.) पुरस्कारासाठी अध्यक्ष के. पी. पाटील यांची निवड केली आहे. साखर उद्योगाशी सबंधीत नाविन्य, रुपांतरण, शाश्वत जागतिक यश आणि साखर उद्योगात उत्कृष्टता यासाठी हा पुरस्कार आहे. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला सर्वाधिक ऊस दर आणि अध्यक्ष पाटील यांच्या साखर कारखानदारीतील योगदानाची दखल घेत संस्थापक व सीईओ उप्पल शाह यांनी अध्यक्ष पाटील यांना निवडीचे पत्र पाठविले आहे. के. पी. पाटील यांनी निवडणुकीनंतर लगेचच राज्यात एक नंबरची एफआरपी जाहीर केला. स्वच्छ, पारदर्शी आणि सभासदाभिमुख कारभार म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण म्हणून आज सगळेच ‘बिद्री’चा दाखला देतात. हा पुरस्कार म्हणजे कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.