सांगली : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार तर राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांना आदर्श कार्यकारी संचालक पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांनी ही घोषणा केली. पुण्यातील भारतीय शुगर या साखर उद्योगातील नामवंत संस्थेच्यावतीने हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांबद्दल माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी पी. आर. पाटील व आर. डी. माहुली यांचे अभिनंदन केले.
कोल्हापूर येथे १० फेब्रुवारी रोजी आयोजित सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. पी. आर. पाटील हे साखर उद्योगातील एक ज्येष्ठ व तज्ज्ञ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी सलग २८ वर्षे अध्यक्षपद भूषविले आहे. आर. डी. माहुली हे संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांकाने एम. डीपॅनलची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. माजी जि. प. सदस्य संजीव पाटील, संचालक दीपक पाटील यांनी आ. जयंत पाटील यांच्या हस्ते तर आर. डी. माहुली यांनी भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र स्वीकारले. यावेळी राजन पाटील, रणजित पाटील उपस्थित होते.