देवरिया : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील साखर कारखाने कवडीमोल दराने विक्री केल्याबद्दल आधीच्या सरकारवर जोरदार टीका केली. आमचे सरकार साखर उद्योगाचा विकास करुन हजारो युवकांना रोजगार देवू इच्छित आहे, असे ते म्हणाले.
देवरियामध्ये ४८० कोटी रुपये खर्चाच्या २२३ विकासकामांचा प्रारंभ करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, जेव्हा मी खासदार होतो, तेव्हाही सर्वसामान्य लोक आणि कार्यकर्ते कोणत्याही आडकाठी शिवाय माझ्याकडे येत होते. मी सुद्धा देवरियातील जनतेच्या मुद्यांबाबत कुशीनगर आणि महराजगंजला जाण्यापासूनही मागे-पुढे पाहिले नाही.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना ते म्हणाले की, भारत जगासाठी एक आदर्शवत मॉडेल बनला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकास योजना प्रत्येक युवक, गरीब, शेतकरी आणि महिलांपर्यंत पोहोचत आहेत. देवरियाला या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाला आहे. योगी म्हणाले की, बैतालपूर साखर कारखाना आमच्याकडे सोपवावा अशी मागणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हा कारखाना म्हणजे या विभागाची ओळख आहे. योगी म्हणाले की, आता साखर पट्ट्यात कारखाना आणि आसवनी, कोळसा, इथेनॉल तयार होत आहे. त्यातून हजारो तरुणांना प्रशिक्षण सुविधा आणि रोजगार मिळेल.