कोल्हापूर, ता. 14 जुलै 2018:
दिल्ली मुंबईसह महाराष्ट्रात होत असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम साखर बाजारावरही झाला आहे. पावसामुळे बाजारातील साखरेची मागणी घटली आहे. त्यामुळे प्रतिक्विंटल साखरे मागे 30 ते 50 रुपयांची घट झाली आहे. काल (शुक्रवार) खुल्या बाजारामध्ये प्रति क्विंटल साखर सरासरी 3200 ते 3300 रुपये होती, आज मात्र यामध्ये तीस ते पन्नास रुपयांची घट झाली आहे. बाजारामध्ये आजही साखर 3150 ते 3250 रुपयाने विकली जात आहे.
गेल्या महिन्यापासून साखरेच्या दरात तेजी आली आहे प्रत्येक कंपनी किंवा साखर कारखान्यांना ठराविक साखर साठा विक्रीसाठी खुला करण्याचे आदेश दिल्यामुळे ही तेजी दिसून येत आहे. केंद्र सरकारनेही साखरेच्या दराची तेजी वाढावी यासाठी बफर स्टॉक करण्याचा चांगला निर्णय घेतला होता. याचाही परिणाम साखर दरवाढीवर झाला आहे. साखर दराबाबतची हे चक्र सुरू असतानाच आता मात्र पावसाने या वरती संकट आणले आहे. राजधानीसह मुंबई तसेच मेट्रो सिटी मध्ये साखरेची मागणी घटली आहे. याचा परिणाम दर कमी होण्यावर झाला आहे. सध्या देशांतर्गत बाजारपेठेत प्रति क्विंटल साखरेचे दर 3150 ते 3200 पर्यंत आहेत. या दरात कर आकारला जातो. त्यामुळे हे दर वाढलेले दिसतात. दरम्यान पाऊस कमी झाल्यानंतर या दरात पुन्हा वाढ होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.