पंतप्रधानांनी गुजरातमधील दहेज येथे पेट्रोनेट एलएनजीच्या पेट्रोकेमिकल्स संकुलाची केली पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात मधील अहमदाबाद येथून पेट्रोनेट एलएनजीच्या दहेज येथील पेट्रोकेमिकल्स संकुलाची पायाभरणी केली आणि 50 प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रांचे लोकार्पण केले.

कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी 200 हून अधिक वेगवेगळ्या ठिकाणांहून लाखो लोक या कार्यक्रमाशी जोडले गेल्याचे सांगितले, आणि देशभरातील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीच्या माध्यमातून विकसित भारताच्या निर्मितीसाठी विकासकामांचा सातत्याने विस्तार होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

त्यांनी दहेज येथील पेट्रोनेट एलएनजीच्या 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या पेट्रोकेमिकल्स संकुलाची पायाभरणी केली आणि ते म्हणाले की या प्रकल्पामुळे देशात हायड्रोजनच्या उत्पादनाला चालना मिळेल आणि पॉलीप्रॉपिलीनची मागणी वाढेल. भारताच्या तरुण लोकसंख्येचा पुनरुच्चार करत पंतप्रधान म्हणाले की, आज उद्घाटन झालेले प्रकल्प त्यांच्या वर्तमानासाठी आहेत, तर आजची पायाभरणी झालेले प्रकल्प त्यांच्या उज्ज्वल भविष्याची हमी देत आहेत.

पंतप्रधानांनी पेट्रोनेट एलएनजीच्या पेट्रोकेमिकल्स संकुलाची पायाभरणी केली ज्यामध्ये दहेज, गुजरात येथील रु. 20,600 कोटी खर्चाच्या इथेन आणि प्रोपेन हाताळणी सुविधांचा समावेश आहे. सध्याच्या एलएनजी रीगॅसिफिकेशन टर्मिनलच्या जवळ पेट्रोकेमिकल्स संकुलाची स्थापना केल्यामुळे प्रकल्पाच्या कॅपेक्स आणि ओपेक्स खर्चात लक्षणीय बचत होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विविध भागांतील रेल्वे स्थानकांवरील जनौषधी केंद्रांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. ही जन औषधी केंद्रे नागरिकांना स्वस्त आणि दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देतील. प्रवाशांचे कल्याण हे याचे उद्दिष्ट असून, रेल्वे स्थानकांमधील जन औषधी केंद्रे आगमन आणि निर्गमन करणाऱ्या प्रवाशांना सेवा देतील, ज्याद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. जन औषधी केंद्रे सर्वांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देतात.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here