नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 शिखर परिषदेत ‘ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स’ची घोषणा केली आणि ते म्हणाले, आम्ही ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स सुरू करत आहोत. भारत तुम्हा सर्वांना या उपक्रमात सामील होण्यासाठी आमंत्रित करतो. ही आघाडी निव्वळ शून्य पूर्ण करण्यासाठी जागतिक प्रयत्नांना गती देण्यास मदत करेल. जैव इंधन व्यापार सुलभ करून उत्सर्जन लक्ष्य पूर्ण करेल.
स्वच्छ इंधनाच्या वापराला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स’ लाँच केले. ‘ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स’ ही काही प्रमाणात स्वच्छ आणि परवडणारी सौर ऊर्जा निर्मितीसाठी 2015 मध्ये भारत आणि फ्रान्सने सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) सारखी आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी फेब्रुवारीमध्ये इंडिया एनर्जी वीक 2023 दरम्यान या युतीची घोषणा केली होती. G20 चे समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले की, अनेक G20 देशांनी ‘ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स’मध्ये सामिल होण्यात स्वारस्य दाखवले आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार ‘ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स’ वाहतूक क्षेत्रात शाश्वत जैव इंधनाच्या वापराला गती देईल आणि सहकार्य सुलभ करेल. जैवइंधन हा उर्जेचा अक्षय स्रोत आहे, जो बायोमासपासून प्राप्त होतो.
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार आणि ग्राहक आहे, त्याच्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 85 टक्के आयात करतो आणि हळूहळू जैवइंधनाचे उत्पादन क्षमता वाढवत आहे. भारत 2070 पर्यंत कार्बन न्यूट्रल होण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. जैवइंधनाच्या वापराचे लक्ष्य आणि विस्तार करत आहे. पेट्रोलमध्ये 2025 पर्यंत 20 टक्के इथेनोल मिश्र्नाचे लक्ष्य निर्धारित केले आहे.