पंतप्रधान नरेंद्र मोदी 27-28 फेब्रुवारी 2024 रोजी केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्राला भेट देणार आहेत.
27 फेब्रुवारी रोजी, सकाळी 10:45 वाजता, पंतप्रधान केरळमधील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला (व्हीएसएससी) भेट देतील. संध्याकाळी 5:15 वाजता, पंतप्रधान तामिळनाडूत मदुराई येथे ‘क्रिएटिंग द फ्युचर – डिजिटल मोबिलिटी फॉर ऑटोमोटिव्ह एमएसएमई आंत्रप्रुनर्स ’ या कार्यक्रमात सहभागी होतील.
28 फेब्रुवारी रोजी, सकाळी 9:45 वाजता, पंतप्रधान तामिळनाडूच्या थुथुकुडी येथे सुमारे 17,300 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. दुपारी 4:30 वाजता, पंतप्रधान महाराष्ट्रात यवतमाळ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील आणि यवतमाळ येथे 4900 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील. कार्यक्रमादरम्यान ते पीएम किसान आणि इतर योजनांतर्गत दिले जाणारे लाभ जारी करतील.
व्ही. ओ. चिदंबरनार बंदराला देशातील पहिले हरित हायड्रोजन केंद्र असलेले बंदर बनवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान इतर अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करतील. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणारे केंद्र, हायड्रोजन उत्पादन आणि बंकरिंग सुविधा आदी प्रकल्पांचा यात समावेश आहे.
पंतप्रधान या दौऱ्यात हरित नौका उपक्रमांतर्गत, भारतातील पहिले स्वदेशी हरित हायड्रोजन इंधनावरील देशांतर्गत प्रवासी जहाजाचे उद्घाटन करतील. या जहाजाची निर्मिती कोचीन शिपयार्डने केली असून, स्वच्छ ऊर्जा उपाय स्वीकारण्याच्या आणि देशाच्या निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जनाच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने एक महत्वाचे पाऊल आहे. पंतप्रधान या कार्यक्रमादरम्यान देशातील दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 75 दीपगृहांच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पर्यटन सुविधांचे लोकार्पण करतील.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान, वांची मनियाच्ची – तिरुनेलवेली विभाग आणि मेलापलायम – अरल्वायमोली विभागासह वांची मनियाच्ची – नागरकोइल रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या राष्ट्रीय रेल्वे मार्ग प्रकल्पांचे लोकार्पण करतील. सुमारे रु. 1,477 कोटी खर्चाचा हा दुपदरीकरण प्रकल्प कन्याकुमारी, नागरकोइल आणि तिरुनेलवेली येथून चेन्नईकडे जाणाऱ्या गाड्यांचा प्रवासाचा वेळ कमी करेल.
पंतप्रधान तामिळनाडूमध्ये सुमारे रु. 4,586 कोटी खर्चाने विकसित केलेल्या चार रस्ते प्रकल्पांचेही लोकार्पण करतील. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग-844 च्या जित्तांदहल्ली-धर्मपुरी विभागाचे चौपदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग-81 च्या मीनसुरत्ती-चिदंबरम विभागातील महामार्गालगत मार्गाचे दुपदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग -83 च्या ओडनचात्रम-मदथुकुलम विभागाचे चौपदरीकरण आणि राष्ट्रीय महामार्ग-83 च्या नागापट्टिनम-तंजावर विभागातील रस्त्याचे दुपदरीकरण, या प्रकल्पांचा समावेश आहे. कनेक्टिव्हिटी (संपर्क सक्षमता) सुधारणे, प्रवासाचा वेळ कमी करणे, सामाजिक-आर्थिक विकास आणि या प्रदेशातील तीर्थयात्रा सुकर करणे हे या प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे.
(Source: PIB)