पुणे : विरोधकांच्या बिनबुडाच्या टिकेला महत्त्व देत नाही. यशवंत सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करणे हा आमच्या पॅनेलचा अजेंडा आहे, असे आश्वासन अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलचे प्रमुख माधव काळभोर यांनी दिले. पुणे जिल्ह्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलच्या प्रचाराची सांगता सभा लोणी काळभोर येथील भाजी मंडई चौकात झाली. त्या सभेत माधव काळभोर बोलत होते. अध्यक्षस्थानी साधना बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर होते.
निवडणुकीत आम्ही टीका करण्यात वेळ घालवला नाही. आम्ही कारखाना कसा सुरू होईल याचे व्हीजन घेऊन सभासदांच्या पुढे गेलो, त्यांना आमचे मुद्दे पटलेत, त्यांनी आमचे स्वागत केले आहे. आरोप- प्रत्यारोपांना जनता कंटाळली आहे. अनेक वर्षे तालुक्यात सहकार नसल्याने विकास खुंटला आहे. सगळ्या संस्था सुरू झाल्या तर शेतकऱ्यांची तरुण मुले पुढे येतील, कारखाना सुरू करण्याच्या उद्देशाने साखर धंद्यातील तज्ज्ञ अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. यावेळी, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के, बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, सुरेश घुले, के. डी. कांचन, विलास आण्णा काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, महादेव कांचन, राजेंद्र टिळेकर, रामदासभाई चौधरी, सुदर्शन चौधरी, जी. बी. चौधरी, नानासाहेब आबनावे, युगंधर काळभोर, लोचनताई शिवले, राजाराम कांचन, अशोक गायकवाड, अनिल टिळेकर आदी उपस्थित होते.