पुणे : आर्थिक अडचणीत आलेला श्री छत्रपती कारखाना बाहेर काढण्यासाठी पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. सर्वपक्षीय शेतकरी कृती समितीच्या वतीने श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. पाच वर्षांमध्ये कारखाना अडचणीतून बाहेर काढणे सोपे नाही; परंतु या पाच वर्षांमध्ये माळेगाव व सोमेश्वर साखर कारखान्याच्या तुलनेत बरोबरीत येण्यासाठी काही वेळ लागेल. पृथ्वीराज जाचक यांना २० संचालकांनी साथ दिल्यास नक्कीच श्री छत्रपती कारखाना हा आर्थिक अडचणीतून बाहेर निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अजित पवार म्हणाले की, पाच वर्षांसाठी पृथ्वीराज जाचक यांनीच नेतृत्व करावे. यात काही अडचण आली तर मी आणि मंत्री दत्तात्रय भरणे सहकार्य करू. गरज भासल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मदत मिळेल. हा कारखाना २२,७८२ सभासदांच्या प्रपंचाचा विषय आहे. त्यामुळे त्यांच्यातून २१ संचालकांची निवड व्हावी. कारखाना सोमेश्वर, माळेगाव या इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी दर देतो. त्यामुळे मलाही २८ लाख रुपये माझा वैयक्तिक तोटा झाला आहे असे ते म्हणाले. पृथ्वीराज जाचक यांनी आपल्या कारखान्याचे पूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी काम करू असे सांगितले. कारखान्यामध्ये कशाही पद्धतीे कामगार भरती केली गेली. यंदा हंगामात फक्त ५ लाख ९० हजार मे. टन गाळप झाले. याला संचालक मंडळ जबाबदार आहे असे ते म्हणाले.