पुणे : जिल्ह्यात सर्वाधिक ऊसगाळप करण्यात खासगी कारखान्यांचा डंका कायम आहे. या कारखान्यांची दैनंदिन ऊस गाळप क्षमता अधिक आहे. सहकारी साखर कारखाने तुलनेने पिछाडीवर पडल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी २९ डिसेंबरअखेर ५०,५७,८५३ टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी उतारा ९.१ टक्के असून ४६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. बारामती ॲग्रो या खासगी साखर कारखान्याने ८,५९,००० टन इतके सर्वाधिक ऊस गाळप केले आहे. सरासरी ८ टक्के उताऱ्यानुसार ६,४०,६६० क्विटल साखर उत्पादन केले आहे.
दौंड शुगरने ५,२३,६०० टन, पराग अॅग्रो फूड्सने ५,११,०२६ टन आणि सोमेश्वर सहकारी कारखान्याने ५,०८,९०० टन ऊस गाळप केले आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात ११ कोटी ५१ लाख टन उसाचे गाळप होईल अशी अपेक्षा आहे. सद्यस्थितीत एक कोटी टन उसाचे गाळप पूर्ण होणे बाकी आहे. दुष्काळी स्थितीमुळे प्रत्यक्षात ऊस गाळप कमी होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयातील सूत्रांनी व्यक्त केला. जिल्ह्यात सध्या दररोज १,२३,२५० टन ऊस गाळप सुरू आहे. त्यामुळे किमान दोन महिने जिल्ह्यातील ऊसगाळप हंगाम चालण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला.