पुणे : उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. इंदापूर तालुक्यातील सर्व पाझर तलाव आपण कुठल्याही संविधानिक पदावर नसताना शंभर टक्के भरून घेतले आहेत. आपल्या मनगटातच पाणी असल्याने आपण हे कोण करू शकतो ? याचा विचार आपण भविष्यात करावा, असे मत माजी सहकारमंत्री तथा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले. सोमवारी कर्मयोगी शंकररावजी सहकारी साखर कारखान्याची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बिजवडी येथील लीलावती मंगल कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात झाली. त्या वेळी पाटील बोलत होते. कारखान्याचा अडचणीचा काळ संपला आहे. पुढच्या वर्षी उसाची चांगली नोंद होणार आहे असे ते म्हणाले.
कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्याच्या जडणघडणीत पाटील कुटुंबाचा त्याग आहे. कारखान्याचे खरे मालक समोर बसलेले सभासद आणि संचालक आहेत. कारखान्याची जुनी देणी देणार, यात शंका नाही. कामगारांचे दोन महिन्यांचे पगार देखील लवकरच दिले जातील. सभासदांनी कारखाना आणि राजकारण हे लांब ठेवले पाहिजे. यावेळी ज्येष्ठ सभासद रामदास गुणवरे, उमेद पठाण, भानुदास नायकुडे, रवींद्र ढवळे, दत्तात्रय बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी विषयांचे वाचन केले. कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी प्रास्ताविक केले. संचालक संपतराव बंडगर यांनी आभार मानले. संचालक शांतिलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगनराव भोंगळे, हनुमंत जाधव, रतन देवकर, प्रवीण देवकर, भूषण काळे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, प्रदीप पाटील, अंबादास शिंगाडे, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरालाल पारेकर, शारदा पवार, कांचन कदम, सतीश काळे उपस्थित होते.