कोल्हापूर :
जगात ब्राझील, भारत, थायलंड आणि ऑस्ट्रेलिया हे चार प्रमुख साखर उत्पादक देश आहेत. त्यापैकी ब्राझील, थायलंड, ऑस्ट्रेलिया या देशात विविध कारणांमुळे उसाचे उत्पादन घटले आहे. मात्र भारतात अतिरिक्त साखर साठा आहे. जगात पुढच्या दोन वर्षात साखरेचे उत्पादन 50 ते 60 लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. साखरेची ही कमी भरुन काढण्याच्या दृष्टीने भारतातील साखर उद्योगाला चांगले दिवस येणार आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या साखरेचे भाव 2700 रुपये क्विंटलच्या जवळपास आहेत. केंद्र सरकारकडून निर्यात अनुदानास प्रति टन 6000 रुपये मिळणारी रक्कम विचारात घेता निर्यात साखरेला प्रतिटन सुमारे 3300 रुपये भाव मिळत आहे. हे लक्षात घेवूनच केंद्राने चालू हंगामासाठी निर्यात अनुदान प्रतिक्विंटल 1048 वरुन 6000 रुपयांवर आणले आहे.
भारत सोडून इतर देशांमध्ये अनेक कारणांमुळे साखर उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे भारताला साखर निर्यात करण्याची चांगली संधी मिळणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहेत. साखर आयातदार देशांमध्ये जगात दुसर्या स्थानावर असणार्या इंडोनेशियामध्ये 13 रिफायरनरींना कच्ची साखर लागते. या देशाला तातडीने 30 लाख टन कच्च्या साखरेची गरज आहे. उच्च दर्जाची गुणवत्ता आणि जवळ असल्याने वाहतूक खर्च कमी यामुळे इंडोनेशिया आणि भारत यांच्यात लवकरच 30 लाख टन साखर निर्यातीचा करार होण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले, कच्च्या साखरेला मागणी अधिक असल्याने कारखान्यांनी या साखरेचे उत्पादन वाढवले तर 60 लाख टन निर्यातीच्या ध्येयापर्यंत आपण पोचू शकतो.
उद्योगतज्ञ विजय औताडे यांनी सांगितले की, ब्राझील आणि थायलंड या पारंपारिक निर्यातदार देशात साखरेचे उत्पादन घटणार आहे. तर भारतात अतिरिक्त साखर उत्पादन होणार आहे. त्यामुळे निर्यातीची संधी महाराष्ट्रासह देशातील इतरही कारखान्यांना मिळणार आहे.