कोल्हापूर : श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने विस्तारीकरणानंतर सर्वच बाबतीत यंदा उच्चांक गाठला आहे. यावर्षी टनास ३४०७ रुपये ऊस दर जाहीर करून राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. तर आता चालू गळीत हंगामात शंभर दिवसांत १० लाख पोती साखर उत्पादन केले आहे. कारखान्याने ८ लाख ८ हजार मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. सहवीज प्रकल्पातून ६ कोटी ४३ लाख युनिट वीज निर्मिती झाली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले कि, कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता साडेसात हजार टन असताना प्रतिदिन सरासरी ८ हजारांपेक्षा जास्त ऊस गाळप करून कारखान्याने नवीन उच्चांक केला आहे. सरासरी १२.३७ टक्के साखर उतारा मिळत आहे. कारखान्याच्या सहवीज प्रकल्पात उत्पादित विजेपैकी ४ कोटी ३२ लाख युनिट वीज महावितरणला विक्री झाली आहे. येत्या काही दिवसांत इथेनॉल प्रकल्प सुरू होईल. उर्वरित दिवसांत आणखी एक ते दीड लाख टन ऊस गाळप करण्याचा मानस आहे असे अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले.