सातारा : जिल्ह्यात साखर कारखान्यांनी ऊस गाळपास वेग दिला आहे. यंदा खासगी कारखान्यांच्या तुलनेत सहकारी कारखान्यांना साखर उतारा जास्त मिळत आहे. ५ डिसेंबरअखेर जिल्ह्यात २३ लाख ८४ हजार ३८४ टन उसाचे गाळप झाले असून कारखान्यांनी १९ लाख ६३ लाख ४९५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. जिल्ह्यात सध्या ८.२३ टक्के साखर उतारा येत आहे. कमी ऊस क्षेत्र असल्याने कारखान्यांनी नोंद नसलेल्या उसाची तोडणी करण्यासही गती दिली आहे.
जिल्ह्यातील १५ कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. यामध्ये नऊ सहकारी व सहा खासगी कारखान्यांचा समावेश आहे. हंगामाला सुरुवात असल्याने सध्या सरासरी ८.२३ टक्के साखर उतारा येत आहे. साखर उताऱ्यात सहकारी कारखान्यांची आघाडी असून ९.५२ टक्के, तर खासगी कारखान्यांना ७.१५ टक्के साखर उतारा मिळत आहे. कारखान्यांनी प्रती टन २८५० पासून ३१०० रुपये दर जाहीर केला आहे. ऊस गाळपात जरंडेश्वर कारखान्याने सर्वाधिक ३,६१,३०० टन ऊस व साखर निर्मितीत कृष्णा कारखान्याने २,९८,९१० क्विंटल उत्पादन केले आहे. साखर उताऱ्यात श्रीराम सहकारी कारखान्याने आघाडी घेतली आहे. कारखान्याला १०.३८ टक्के साखर उतारा मिळत आहे.