नवी दिल्ली : देशात गेल्या वर्षीच्या हंगामात ३१९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. मात्र, यंदा सरासरी साखर उताऱ्यात ०.२५ टक्क्याने घट आहे. गतवर्षीच्या तुलनेत २९ कारखान्यांतून गाळप सुरु न झाल्यामुळे आतापर्यंतचे साखर उत्पादन १३.५० लाख टनांची घटले आहे. त्यामुळे हंगामाअखेर साखर उत्पादनात सुमारे ३९ लाख टनांची घट अपेक्षित असल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने म्हटले आहे. देशात चालू हंगामाअखेर २८० लाख टन नव्या साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात ३९ लाख टनांची घट होईल, असा दावा महासंघाने केला आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात ४७२ साखर कारखान्यांतून ऊस गाळप गतीने सुरू आहे. १५ डिसेंबरअखेर ७२० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी ८.५० टक्के उताऱ्यासह ६१ लाख टन साखर उत्पादन झाले. एकूण हंगामाची स्थिती पाहता २८० लाख टन नव्या साखरेचे उत्पादन होईल. याचबरोबर इथेनॉल निर्मितीसाठी ४० लाख टन साखरेचा वापर होणार आहे. साखरेच्या किमान विक्री दरातील वाढ आणि साखर उद्योगातून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरातील वाढ हे दोन प्रश्न मार्गी लावले जात आहेत. पुढील दोन -तीन आठवड्यात यावर निर्णय होतील असे महासंघाच्यावतीने सांगण्यात आले.