कोल्हापूर : शाहूनगर (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ५९ दिवसांत २,६६,३८० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३,१५,९१० साखर पोती उत्पादित केली आहेत. सरासरी साखर उतारा ११.८६ टक्के एवढा आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या गतिमान कारभारामुळे ऊस गाळप वेगाने होत आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील-देवाळेकर व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली.
अध्यक्ष पाटील व उपाध्यक्ष कवडे यांनी सांगितले की, कारखान्याने १६ ते ३१ डिसेंबर अखेरच्या पंधरवड्यातील उसाचे बिल प्रती टन ३२०० रुपये दराप्रमाणे २४ कोटी ६६ लाख रुपये बिल ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहेत. भोगावतीच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून कारखान्याचे यंदा सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट आहे. ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे. यावेळी सर्व संचालक, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे आदी उपस्थित होते.