पुणे : तमिळनाडूतील तीन कारखान्यांचा अपवाद वगळता देशभरातील ५३१ कारखान्यांच्या गळीत हंगामाची समाप्ती झाली आहे. देशात एकूण ३,१३७.८० लाख टन उसापासून ३१६.७० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ऊस गाळप १७९ लाख टनांनी कमी आहे. साखरेचे उत्पादनही १० लाख टनांनी घटले आहे. महाराष्ट्राने साखर उत्पादन देशात पहिला क्रमांक पटकावला असून, राज्यात ११०.२० लाख टन उत्पादन झाले. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशने १०३.६५ लाख टन साखरे उत्पादन झाले आहे.
देशातील तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यांत सप्टेंबरपर्यंत विशेष गाळप हंगाम देखील चालणार आहे. यातील अपेक्षित साखर उत्पादन पाहता हंगामअखेर देशपातळीवर ३२१.२५ लाख टन निव्वळ साखर उत्पादन होईल. २१ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविली जाणार आहे. दरम्यान, निव्वळ साखरेचे उत्पादनदेखील गतवर्षीपेक्षा ९.६५ लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र, यंदा देशपातळीवर सरासरी साखर उतारा १०.२० टक्के मिळाला आहे. राज्यनिहाय साखर उत्पादन पाहता कर्नाटकमध्ये ५२.६० लाख टन, गुजरातमध्ये ९.२० लाख टन, तमिळनाडूमध्ये ८.८५ लाख टन, बिहारमध्ये ६.८५ लाख टन, पंजाबमध्ये ६.२० लाख टन, हरियाणात ५.९० लाख टन, मध्य प्रदेशात ५.२० लाख टन, उत्तराखंडमध्ये ३.१० लाख टन, आंध्र प्रदेशात १.६० लाख टन आणि उर्वरित देशात १.५० लाख टन उत्पादन झाले आहे.