नाशिक : दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याचे या गळीत हंगामात दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. आता इथेनॉल निर्मितीला सुरुवात करुन दोन दिवसांत जवळपास ५९ हजार २३२ लिटर इथेनॉल निर्मिती केली आहे. अडचणींवर मात करुन प्रत्यक्ष इथेनॉल निर्मिती सुरू झाली आहे. चेअरमन श्रीराम शेटे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. गेल्यावर्षी प्रकल्प सुरू होवूनही इथेनॉल निर्मितीची परवानगी नसल्याने स्पिरीट निर्मिती करण्यात आली. आता या हंगामात इथेनॉल निर्मिती सुरू झाली आहे.
कारखान्याला सुरुवातीला पाच लाख लिटर इथेनॉल निर्मितीचा कोटा मिळाला होता. मात्र नंतर केंद्राने इथेनॉल निर्मितीवर बंदी आणली. नंतर बंदी मागे घेत कोटा कमी केला. बी. हेवी मोलॅसिसपासून तीन लाख लिटर इथेनॉल निर्मितीस परवानगी दिली आहे. गेल्या दोन दिवसांत ५९,२३२ लिटर इथेनॉल निर्मिती झाली आहे. तर २३,६५,५४७ लिटर स्पिरीट निर्मिती झाली आहे. कारखान्याने ८६ दिवसांत एकूण २,०१,६७४ मे. टन उसाचे गाळप झाले असून सरासरी साखर उतारा ११.६१ % आहे. एकूण २,३२,८०० क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा करावा, असे आवाहन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले आहे. यावेळी व्हा. चेअरमन शिवाजीराव बस्ते, सर्व संचालक, प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर आदी उपस्थित होते.