पुणे : सोमेश्वर कारखाना शिल्लक असणाऱ्या संपुर्ण उसाचे वेळेत गाळप करण्यासाठी व हंगाम साधारणतः १८ ते २० मार्च पर्यंत संपविण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याने सभासद बांधवांनी बाहेरील कारखान्यास ऊस घालू नये. कारखान्याने मंगळवार (दि. २८) अखेर ७४ दिवसांमध्ये ६ लाख ७५ टन उसाचे गाळप केले असून यामधून सरासरी ११.३४ टक्के साखर उतारा राखत ७ लाख ६३ हजार किंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले.
जगताप म्हणाले, कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ७५०० टन प्रतिदिन असताना देखिल प्रति दिवस ९ हजार १३४ मे. टनाच्या उच्चांकी सरासरीने आपण गाळप करीत आहोत. तसेच आपल्या कारखान्याच्या को-जन प्रकल्पामधून ४,४९,५९,९६३ युनिट्सची असून वीजनिर्मिती केली २,४८,६२,५७२ युनिट्सची वीजविक्री केलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून ३३,४०,८०३ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असून सोबत २०,९३,१९१ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे.
आजअखेर ५ लाख ६२, हजार २ टन ऊसासाठी रक्कम १५७ कोटी ३६ लाख ऊस उत्पादकांना अदा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर गाळपास येणार्या पूर्व हंगामी ऊसास प्रतिटन ७५ रुपये, सुरु व खोडवा उसास प्रति टन १५० रुपये प्रमाणे आपण अनुदान सभासदांच्या खात्यावर रक्कम वर्ग करणार आहोत. हंगाम संपल्यानंतर एफआरपी. प्रमाणे उर्वरीत साधारणतः प्रति टन ३५० रुपये असे एकूण प्रतिटन ३ हजार १५० रुपये व त्यापुढेही जावून गेली अनेक वर्षे उच्चांकी दर देण्याची पंरपरा आहे ती या हंगामामध्येही आपण कायम राखणार आहोत, असे जगताप यांनी नमूद केले.