सातारा : यंदाच्या हंगामात सातारा जिल्ह्यातील १७ पैकी ९ कारखान्यांनी ९ कोटी ३५ लाख ४६ हजार लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. केंद्र सरकारकडून बी हेवी मोलॅसिस आणि सिरप पासून इथेनॉल बंद असल्याने यंदा उत्पादनाला फटका बसला आहे. तर काही कारखान्यांनी मळीचा मोठा स्टॉक करून ठेवला आहे. यंदा केंद्राने बी हेवी मोलॅसिस व उसाच्या सिरपपासून इथेनॉल उत्पादनाला बंदी घातली. या निर्णयामुळे बहुतांश इथेनॉल उत्पादन करणाऱ्या कारखानदारांचे नियोजन फिस्कटले असे दिसून आले आहे.
राज्यात यंदा उच्चांकी १०९ लाख टनांचे साखर उत्पादन झाले आहे. राज्यामध्ये इथेनॉल निर्मितीची मोठी क्षमता आहे. त्यामुळे इथेनॉलची निर्मिती होते. परंतु, इथेनॉलकडे जाणारे सिरप किंवा मोलॅसिसपासून साखर निर्मिती करावी लागली. त्यामुळे आर्थिक फटका कारखान्यांना बसला. जिल्ह्याचा विचार करता अजिंक्यतारा, सह्याद्री, किसनवीर भुईंज, जरंडेश्वर, स्वराज आणि खटाव-माण या कारखान्यांकडे मोठी क्षमता असणारे इथेनॉल प्रकल्प आहेत. यातील ९ कारखान्यांनी इथेनॉलची निर्मिती केली आहे. ज्यांना इथेनॉल निर्मिती करणे शक्य झाले नाही त्यांनी मळीचे उत्पादन करून ठेवले आहे. अनेकांनी त्यातील मळीची विक्री केली. अनेकांनी मळीचा स्टॉक केला. केंद्राने नुकतीच बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यावरील बंदी उठवली आहे. त्यामुळे याचा या कारखान्यांना फायदा होणार आहे.